नाशिक। दि. १२ जानेवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी आवक लक्षात घेऊन नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने वाहतूक व्यवस्थेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विविध वाहतूक क्षेत्रातील भागधारकांची बैठक आयोजित करण्यात आली.
कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांची वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध राहावी यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कृती मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी भूषविले. बैठकीदरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी सुधारणा, वाहन संचालनाचे प्रभावी नियमन तसेच भाविक आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कुंभमेळ्याच्या काळात बस-आधारित वाहतूक मोठ्या प्रमाणावर बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमुख यात्रा मार्गांवर तसेच मोठ्या पार्किंग स्थळांपासून स्नानघाटांपर्यंत अतिरिक्त शटल बस सेवा सुरू करण्यात येणार असून गर्दीच्या कालावधीत अखंड शटल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बस स्थानकांवरील थांबा व सेवा सुविधाही वाढविण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
या परिषदेत प्रवासी सुरक्षा, मार्ग शिस्त, भाविकांशी सुसंवाद, वाहतूक नियमांचे पालन आणि परवाना नियमावली यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परवाने, नोंदणी व आवश्यक कागदपत्रांबाबत सुलभता निर्माण करणारी यंत्रणा या उपक्रमाशी जोडण्यात येणार आहे. पार्किंग व्यवस्थापन हा बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरला. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गालगत बाह्य व मध्यम अंतरावरील पार्किंग स्थळांचे नियोजन करण्यात येणार आहे. शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या क्षमतेची पार्किंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
डिजिटल प्रणाली व अंमलबजावणी यंत्रणांच्या माध्यमातून वाहन हालचालींचे नियमन करण्यावरही भर देण्यात आला. बेकायदेशीर व नोंदणी नसलेल्या वाहनांवर नियंत्रण, रिक्षा व टॅक्सी संचालनाचे नियमन आणि ऑनलाइन परवाना प्रणाली अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
अमृत स्नानाच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड राहावा यासाठी औषधे, दूध, भाजीपाला आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मालवाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीशी समन्वय साधण्यात येणार आहे. वाहतूक व मार्ग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. मार्ग बदल, रस्ते बंदी याबाबतची तात्काळ माहिती डिजिटल प्लॅटफॉर्म व संदेश सेवांच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच नाशिक जिल्हा परिवहन संघटना, टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, रिक्षा संघटना, कार भाडे सेवा आणि खासगी बस चालक संघटनांचे प्रतिनिधींनीही आपले अभिप्राय मांडले.
👉 बैठकीतील महत्वाचे मुद्दे आणि निर्णय:
👉 कुंभमेळा २०२७साठी वाहतूक आराखडा सज्ज; भाविकांच्या सुरक्षित प्रवासावर भर.
👉 नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात अखंड शटल बस सेवा; वाहतूक व्यवस्थेचा व्यापक आढावा.
👉 कुंभमेळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरण सज्ज; भागधारकांची महत्त्वपूर्ण बैठक.
👉 भाविक वाहतुकीसाठी बस, रिक्षा व पार्किंग व्यवस्थेत मोठे बदल.
👉 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाला गती; डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर
![]()


