नाशिक कुंभमेळा: आवश्यक प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला धार्मिक महात्म्य असून जिल्ह्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा अधिक स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांसह लोकसहभाग अधिक महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळा २०२७ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित व स्वच्छ होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी नागरिकांना या कामात सहभागी केले पाहिजे. प्रशासनाकडून राबविलेल्या उपक्रमांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने कसे सहभागी होतील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रथम टप्प्यातील जी कामे होण्यास दोन वर्षे लागणार आहेत अशा कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. कालावधी कमी असल्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करण्यासह कामे उत्तम दर्जाची होतील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. यासाठी कालबद्ध व काटेकोर नियोजन सर्व यंत्रणांनी करावे, असे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी ऐन पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकासांठी वाहनतळ व्यवस्था ही शहराच्या नजीक असावी व चिखलामुळे वाहने फसणार नाहीत यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यासह वाहनतळासाठी स्थळे निश्चित करावी. देशभरातील भाविक येथे येणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी 5 किंवा त्यापेक्षा अधिक हेलिपॅड तयार करणे व त्या ठिकाणी वाहन व्यवस्था उभारणीसाठी नियोजन करावे. प्रयागराजच्या तुलनेत नाशिक शहरात रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी जागा मर्यादित आहे. मागील कुंभमेळाच्या तुलनेत यावेळी भाविकांची गर्दी जास्त अपेक्षित असल्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिल्या. येणाऱ्या काळात सिंहस्थ कुंभमेळासाठी साप्ताहिक बैठक घेतली जाणार असून सूक्ष्म नियोजनासह सर्व यंत्रणांच्या सहभागातून कुंभमेळा अधिक सुंदर व यशस्वी करू, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरे येथील तर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी नाशिक शहरासाठीचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण करत तातडीने सुरू करावयाच्या कामांची माहिती दिली.

रामकुंड परिसराची पाहणी:
तत्पूर्वी मंत्री महाजन यांनी रामकुंड परिसर, रामकालपथ, नारोशंकरचे मंदिर, काळाराम मंदिर, सीता गुंफा, निळकंठेश्वर महादेव मंदिर, कपिला – गोदावरी संगम, तपोवन, नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, स्वीय सचिव जयराज कारभारी, महानगरपालिकेचे शहर अभियंता राजेश अग्रवाल, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह उर्जा, महावितरण व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती मंत्री  महाजन यांना दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790