
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधला तपोवनातील साधू, महंत यांच्याशी संवाद
नाशिक। दि. ३ सप्टेंबर २०२५: नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा साधू, महंत आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रशासन नियोजन करीत असून दीर्घ कालावधी लागणारी कामे पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आदींनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, श्री दिगंबर अनी आखाडा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवनातील कपिला संगम येथे भेट देत तेथील साधू, महंत यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांचा कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर वरीष्ठ अधिकारी भेट देऊन कामांची पाहणी आणि साधू, महंत यांच्याशी संवाद साधत आहेत.
आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल, असे नियोजन करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. साधू, महंत यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साधू, महंत यांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी तपोवन परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी साधुग्रामच्या जागेची साधू, महंत यांच्यासमवेत पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी कपिला संगम येथे भेट देत राम सृष्टीची पाहणी करून याठिकाणी आरती केली.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून साधू, महंत येतील. त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तपोवन येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपायुक्त चंदक्रांत खांडवी, तहसीलदार अमोल निकम, राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज, महंत शंकरदास महाराज, माधवदास राठी आदी उपस्थित होते.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790