नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. २८ डिसेंबर २०२५: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील साधू, महंतांच्या आखाड्यांना आवश्यक त्या मुलभूत सोईसुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली, तर संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अर्थात तीन जानेवारीपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळा आणि संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या कार्यालयात आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आज आखाड्यांच्या साधू महंतांशी संवाद साधला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, अधिकारी यांची ही बैठक घेत विविध सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी), तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आखाड्यांचे संत, महंत उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: द्वारका चौक सुधारणा प्रकल्पाला मंजुरी; २१४ कोटींची तरतूद – नितीन गडकरी

आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, त्रंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आखाड्यांनाही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी आराखडा सादर केल्यावर कार्यवाही केली जाईल. तसेच त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नवीन घाट बांधण्याचे नियोजन आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा, वीज, स्वच्छ्ता आदींचे नियोजन करण्यात येत आहे. या सर्व कामांचा आढावा घेतला. याबरोबरच गोदावरी नदीच्या स्वच्छतेबरोबरच ती बारमाही प्रवाहित होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगत त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, पुढील महिन्यात संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा होणार आहे. यानिमित्त राज्यभरातून भाविक शहरात येतील. त्यांच्यासाठी पुरेश्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्र्यंबकेश्वर शहर सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यात सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी कुंभमेळा आणि संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: द्वारका चौक सुधारणा प्रकल्पाला मंजुरी; २१४ कोटींची तरतूद – नितीन गडकरी

यावेळी विविध आखाड्यांचे साधू, महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना केल्या. या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त श्री. सिंह, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790