Amazon

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याआधी नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन !

नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार, २५ ऑक्टोबर रोजी यशवंत महाराज पटांगण येथे ५०१ जण एकत्रित शंखनाद करणार असून, ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी रामकुंड येथे सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधवांच्या सहभागातून सामूहिक गंगा-गोदावरी आरती करण्यात येणार आहे.

या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह धार्मिक भावना आणि सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कारची काच फोडून २० लाखांची रोकड लंपास; अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी बॅग पळवली

कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तिचरण दास महाराज, रामतीर्थ गोदा सेवा समितीचे जयवंत गायधनी आणि गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याची माहिती जिल्ह्यातील गावागावांत पोहोचविण्यासाठी विविध सेवाभावी संस्था, समित्या आणि नागरिकांच्या सहभागातून हे उपक्रम राबविले जाणार आहेत. पहिला उपक्रम अनंत विजय शंखनाद ग्रुपच्या सहकार्याने २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यशवंत महाराज पटांगण येथे होणार आहे. यामध्ये ५०१ जण एकाच वेळी शंखनाद करून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करतील. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळीही शंखनाद करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आरोग्य तपासणीत त्वचारोगाचे सर्वाधिक रुग्ण; दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

दुसरा महत्त्वाचा उपक्रम ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड येथे आयोजित करण्यात आला आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सहकार्याने होणाऱ्या या सामूहिक गंगा-गोदावरी आरतीमध्ये जिल्ह्यातील हजारो जनजाती बांधव सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी गावागावांत प्रशिक्षण आणि नियोजन सुरू असून, अहिल्याबाई होळकर पुलापासून रामकुंड परिसरापर्यंतचा भाग आरतीसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.

६ हजार ५५९ जणांची नोंदणी:
गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ६५० गावांसह नाशिक शहरातील २८ वस्त्यांमधील नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. आरतीसाठी जनजाती बांधवांची तयारी सुरू असून, आतापर्यंत ६ हजार ५५९ जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती जयवंत गायधनी यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत २५ लाखांची फसवणूक

रामकुंड परिसराच्या स्वच्छतेवर भर:
सामूहिक आरतीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने रामकुंड घाट परिसराच्या स्वच्छतेसह व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या उपक्रमासाठी महापालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन परिसर स्वच्छ ठेवणे आणि कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे याला प्राधान्य दिले जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790