News

सिंहस्थ कुंभमेळा: नवीन घाटांची निर्मिती करतांना सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा- गिरीश महाजन

नाशिक, दि. 17 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा सोहळा असून देशभरातून मोठ्या संख्येने येथे भाविक येणार आहेत. पर्वणी काळातील अमृतस्नानाच्या दृष्टीने नवीन घाटांची निर्मिती करतांना त्यांच्या सौंदर्यीकरणावर भर द्यावा. तसेच सर्व यंत्रणांनी सिंहस्थ कुंभमेळा संबंधित कामांना गती देवून ती वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने विविध शासकीय विभागांचा कामकाज आढावा जलसंपदा मंत्री महाजन यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्यात भाविकांच्या स्नानासाठी नियोजित नवीन घाटांची निर्मिती करतांना शंभर वर्षाचा दृष्टीकोन ठेवून त्यांचे बांधकाम दगडात केल्यास ते अधिक उपयुक्त ठरतील. घाटांच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात यावी. घाटांचे सुशोभीकरण करतांना इतर शहरातील सुंदरतेने साकारलेल्या घाटांचे अवलोकन करून आराखडा तयार करावा. याकामी प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा.घाटांची निर्मिती करतांना नैसर्गिक साधनसंपत्तीला बाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. ज्या यंत्रणांच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे अधिकार त्यांच्या विभागांकडे आहेत. त्यांनी सदर मान्यता प्राप्त करून कामांना सुरूवात करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी पूर्णपणे बंद राहणार !

आपत्ती व्यवस्थानपाच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ, आपत्ती वाहन व अनुषंगिक आवश्यक बाबींचे प्रस्ताव महानगरपालिका व त्र्यंबक नगर परिषद यांनी सादर करावेत. तसेच इतर विभागांनी अतिरिक्त मागणीचे प्रस्तावही वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात १४ धरणांतून विसर्ग; गंगापूरमधून ४१४ क्यूसेक पाणी सोडले

तपोवनतील लक्ष्मी नारायण मंदिरच्या वरील बाजूस नवीन घाट निर्मिती करण्यास वाव असून या जागेत घाट निर्मिती झाल्यास भाविकांची अधिक चांगली सोय याठिकाणी होणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने सुरक्षितेच्या दृष्टीने शहरात येणारे पोलीस कर्मचारी तसेच परिवहन मडंळाचे कर्मचारी यांच्या निवासाच्या दृष्टीने समन्वयातून नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक -त्र्यंबकेश्वर हा रस्ता तयार करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच रस्ता तयार करतांना रस्ता दुभाजक सर्व ठिकाणी समान दिसतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी बैठकीत दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २०) वीजपुरवठा बंद राहणार !

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिश्मा नायर, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचके, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपअधिक्षक वासुदेव देसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here