नाशिक। दि. १७ जून २०२५: सिंहस्थ कुंभमेळा आयोजनामध्ये सर्व विभागांची महत्वाची भूमिका आहे. संबंधित विभागांनी या सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाला परिपूर्णता आणण्यासाठी त्यातील प्रस्तावामधील बाबी पुन्हा तपासाव्यात आणि ते अचूक होतील याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.
नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत व नाशिक विभागातील इतर क्षेत्रामध्ये होणाऱ्या कुंभमेळा व संलग्न उपक्रमांचे आयोजन व व्यवस्थापना साठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी झाला. या प्राधिकरणाची पहिली बैठक आज विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष तथा मनपा उपायुक्त करिश्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक आरोग्य , रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, लेखा व कोषागारे, महावितरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, डॉ. गेडाम म्हणाले की, ही प्राधिकरणाची पहिलीच बैठक आहे. या अनुषंगाने सर्व विभागांची एकत्रित बैठक ही नियोजनाच्या दृष्टीने महत्वाची आहे. सर्व विभागाने या सोहळा कालावधीत करावयाच्या कामांचे नियोजन तयार केले आहे. त्यात अधिक अचूकता येण्यासाठी त्यातील महत्वाच्या बाबीवर आता अधिक व्यापक प्रमाणात लक्ष देणे आवश्यक आहे.
या बैठकीत कुंभमेळा अनुषंगाने करावयाच्या विविध कामाबाबत चर्चा झाली. त्यात आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या रुपये ४ हजार कोटींच्या निविदा लवकरात लवकर अंतिम करून कार्यारंभ देणे आणि रक्कम रुपये २ हजार कोटींच्या प्रगतीपथावर असणाऱ्या निविदा तत्परतेने निर्गमित करण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय लवकरच:
कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय सुरू करण्याबाबत आणि त्यासाठी जागेची निवड करण्याबाबत डॉ. गेडाम यांनी उपयुक्त करिश्मा नायर यांना सांगितले. मध्यवर्ती ठिकाणी असणारे, समन्वय आणि नियोजनासाठी सर्वांना सुलभ असेल अशी जागा निवडावी, असे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा कक्ष अधिक व्यापक होणार:
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या कामातील सुसूत्रतेसाठी यापूर्वीच कुंभमेळा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तो अधिक विस्तृत आणि व्यापक करून नियोजन आणि अंमलबजावणी, गुणवत्ता नियोजन आणि समन्वय या बाबीकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790