Amazon

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर! पार्किंग, साधुग्राम अन् घाट विकासाचा आढावा

नाशिक, दि. १७ ऑक्टोबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यावर भर दिला आहे. पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील मूलभूत सुविधा आणि घाट विकासाच्या कामांचा शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांमधील समन्वय वाढवून प्रलंबित कामे आणि तांत्रिक अडचणी वेळेत दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा प्राधिकरणात ही बैठक पार पडली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वीज पारेषण, वन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रतिनिधींनीही बैठकीत सहभाग घेतला.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध; भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

कुंभमेळ्याच्या नियोजनात सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कामे करावीत, तसेच प्रत्येक प्रकल्पाची सद्यःस्थिती, प्रलंबित मान्यता आणि तांत्रिक अडचणींची अद्ययावत माहिती ठेवावी, असे निर्देश डवले यांनी दिले. विविध यंत्रणांशी संबंधित निर्णय प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यावरही त्यांनी भर दिला.

पार्किंग आणि वाहतुकीच्या नियोजनावर भर:
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रस्तावित पार्किंग स्थळे, वाहनांसाठीची क्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था उभारण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. भाविकांना पार्किंग, प्रमुख मार्ग आणि विविध सुविधांची ठिकाणे सहज शोधता यावीत, यासाठी दिशादर्शक फलकांची ठिकाणे, रचना आणि अंमलबजावणी यांवरही चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

साधुग्राममध्ये मूलभूत सुविधांची उभारणी:
साधुग्रामच्या नियोजित आराखड्यासह उपलब्ध जागा, अंतर्गत रस्ते आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. साधू-महंतांच्या निवासासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, प्रकाशव्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्रित नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घाट विकासासोबत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे नियोजन:
घाटांच्या विकास आराखड्याबरोबरच भाविकांच्या ये-जा करण्याचे मार्ग, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता, प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक नागरी सुविधांवरही बैठकीत चर्चा झाली. कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन घाटांवरील कामे आणि त्यांना पूरक सुविधांचे नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून कोट्यवधींच्या नफ्याचे आमिष दाखवून ९८.६० लाखांची फसवणूक

विविध विभागांच्या कामांमध्ये सुसूत्रता राखणे, प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे महत्त्वाचे असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, वीज व पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधा परस्परांशी संबंधित असल्याने सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत संबंधित विभागांना कामांची सद्यःस्थिती, प्रलंबित प्रशासकीय मान्यता, तांत्रिक तपशील आणि निर्धारित वेळापत्रक यांची अद्ययावत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. समन्वयातून मार्गी लावता येणाऱ्या विषयांवर तातडीने निर्णय घेऊन कामांची गती कायम ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि विविध पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थांच्या समन्वयातून तयारी सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790