नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: रास्तभाव दुकानांच्या वेळेची मर्यादा ओलांडून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यातील पहिले अत्याधुनिक ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लाभार्थीकेंद्रित होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील डिस्टिलरी क्वार्टर, गोरेवाडी रोड येथे मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते या धान्य एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त प्रशांत काळे, जिल्हा धान्य वितरण अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धान्य वितरण अधिक सुलभ:
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य सन्मानाने आणि वेळेत मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज विविध क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना अन्नधान्य वितरण व्यवस्थेतही त्याचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सुमारे ५४ हजार रास्तभाव दुकाने कार्यरत असून, त्यांच्यामार्फत सुमारे सात ते साडेसात कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जातो. निर्धारित प्रमाणात धान्य वितरण, प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे याला शासनाचे प्राधान्य आहे. रास्तभाव दुकानांच्या ठरावीक वेळेत धान्य घेणे अनेक नागरिकांना, विशेषतः कामानिमित्त बाहेर असणाऱ्या व्यक्तींना, अडचणीचे ठरते. धान्य एटीएमच्या सुविधेमुळे लाभार्थ्यांना अधिक सोयीच्या वेळी धान्य मिळविणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
पारदर्शक आणि कार्यक्षम सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडे वाटचाल:
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ई-पॉस यंत्रणा, आधार आधारित प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदींच्या माध्यमातून पारदर्शकता वाढविण्यात येत आहे. धान्याची उचल, वाहतूक आणि लाभार्थ्यांपर्यंत वितरण या प्रक्रियांतील अनावश्यक टप्पे कमी केल्यास वेळेची बचत होऊन व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वितरणातील अडचणी कमी करून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
नाशिकनंतर नागपूर आणि ठाण्यातही सुविधा:
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नाशिकमध्ये अन्नपूर्ती धान्य एटीएम सुरू केल्याबद्दल मंत्री श्री. भुजबळ यांचे आभार मानले. या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना चोवीस तास धान्य वितरणाची सुविधा उपलब्ध होणार असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपायुक्त श्री. काळे म्हणाले की, अन्नपूर्ती धान्य एटीएममुळे स्थलांतरित कामगारांसह सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार धान्य मिळविणे सुलभ होणार आहे. महाराष्ट्रात प्रस्तावित तीन धान्य एटीएमपैकी पहिल्या एटीएमची सुरुवात नाशिक येथे झाली असून, पुढील एटीएम नागपूर आणि ठाणे येथे सुरू करण्याचे नियोजन आहे. यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते धान्य एटीएमच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात आले.
![]()


