कुंभमेळा २०२७: गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचे निर्देश

नाशिक। दि. ५ मार्च २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट संदर्भात विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता कामे निर्धारित निकषांनुसार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस नियोजन विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील, योगेंद्र चौधरी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.बारावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या कमाल तापमानात वाढ… जाणून घ्या सविस्तर…

कुंभमेळा अनुषंगाने विविध विभागांकडून हाती घेण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता, मोजमाप नोंदी, करारनामे, देयके आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण संस्था टीयुव्ही एसयुडी साऊथ अशिया प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेला आयआयटीबी आणि अन्य तज्ञ संस्थांचे सहकार्य राहील. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व कार्यान्वयन यंत्रणा व अंमलबजावणी अभिकरणांनी आवश्यक कागदपत्रे संस्थेकडे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. पूर्ण झालेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अहवाल प्राप्त न झाल्यास देयक अदा केले जाणार नाही, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: परदेशात जाण्यासाठी पैशांवरून विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

बैठकीत कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्रयस्थ संस्था ऑडिटदरम्यान उद्भवणाऱ्या त्रुटी तत्काळ दूर करून अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कामांमध्ये समन्वय ठेवून पारदर्शक व दर्जेदार अंमलबजावणी करण्याचे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790