नाशिक: कुंभ मंथनातील सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करणार – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. २१ सप्टेंबर २०२५: सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे. तो स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभ मंथनातून प्राप्त सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आज पंडित पलुस्कर सभागृह (इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक) येथे कुंभ मंथन लोकसहभागातून यशस्वी कुंभमेळ्याकडे हा कार्यक्रम झाला, यावेळी ते बोलत होते.

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा महोत्सव आहेत. यामुळे रस्ते, पुलांची कामे होणार आहेत. रस्ते तयार करताना ती दीर्घकाळ टिकतील, असे नियोजन करण्यात येईल. टिकाऊ कामांवर भर राहील. दुचाकी प्रवासी वाहतुकीचा विचार केला जाईल. कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजनांचे नियोजन करण्यात येईल. अमृत स्नानाचा कालावधी पावसाळ्यात असल्याने भाविकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येईल. कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे, यापुढील काळातही नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मौलिक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री श्री. महाजन यांनी केले.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळ्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. कुंभमेळा केवळ जिल्हा प्रशासनाचा नाही, तर सर्वाचा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी घर घर कुंभ अभियान राबविण्यात येईल.
कुंभमेळ्यानिमित्त विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्या कायमस्वरूपी राहतील. पर्यटन क्षेत्राला चांगली संधी आहे. त्यामुळे नवनवीन संकल्पनांचे स्वागतच आहे. यानिमित्त नाशिकच्या विकासाला बुस्टर डोस मिळेल. याबरोबरच शहराचे रूप पालटण्यासाठी कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभमेळ्यातून नावीन्यपूर्ण संधी शोधल्या पाहिजेत. तसे झाल्यास धार्मिकतेबरोबरच आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधता येईल, असेही त्यांनी सांगितले. आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

यावेळी आशिष नहार, दिलीप तुपे, गौरव ठक्कर, ललित बूब, संजय सोनवणे, संजय कोटेकर, सुजाता बच्छाव, राजाराम सांगळे, गोविंद बोरसे, योगेश जोशी, भाऊसाहेब शिंदे, डॉ. नीलेश निकम, डॉ. मंगेश शेटे, राजेंद्र फड, डॉ. निशा पाटील, पी. एम. सहानी, सोमनाथ गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा, ऋषभ बोहरा, सुनील आडके, मिलिंद राजपूत, हर्षद भागवत, सोनल कासलीवाल, पंकज पाटील, हर्ष देवधर, संकेत काकड आदी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध विकासात्मक व मौलिक सूचना केल्या.

यात नाशिक- संभाजीनगर रस्त्यावर शिलापूर पर्यत सर्व्हिस रस्ता तयार करावा, गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, गर्दी टाळण्यासाठी सेलिब्रिटी व्यक्तींचे आवाहनात्मक संदेश प्रसारीत करावे. स्वयंसेवक नोंदणीसाठी पोर्टल तयार करावे, हवाई प्रवासासाठी सुविधा वाढवाव्यात, द्वारका- नाशिक रोड रस्ता वाढविणे, समृध्दी महामार्गाला जवळपास कनेक्टीव्हीटी मिळणे, मखमलाबाद परिसरात स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर 100/200 कुटुंबासाठी धर्मशाळा बांधकामाससाठी मंजुरी मिळावी, अंबड सातपुर एमआयडीसी परिसरात गटार योजना राबवावी, राम काल पथ च्या धर्तीवर रामकुंड परिसरात पर्यटकांसाठी लाईट शो करावा, नाशिक पुणे रेल्वे कनेव्टीव्हीटी वाढवावी, वॉटर एटीएम, नाशिक व्हॅली टुरिझम, माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी सुविधा, प्रदर्शन केंद्र सुरू करावे, वैद्यकीय क्षेत्रासाठी हेल्पलाइन सुरू करावी, स्वयंसेवकांना जीवरक्षक, किमान प्रशिक्षण द्यावे, पार्किंगची व्यवस्था, जकात नाक्याच्या ठिकाणी ट्रक टर्मिनल कार्यान्वित करावे, टोलनाक्यावर विविध भाषांचे हेल्प डेस्क उभारावे, कुंभमेळ्यासाठी ऍप तयार करावे, प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकीला परवानगी मिळावी, निवास व्यवस्था वाढवावी आदी सूचना केल्य.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार मंगेश चव्हाण, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790