LPG

नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

आधुनिक तंत्रज्ञान, एआय दालन, जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन

नाशिक। दि. १२ मार्च २०२६: जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शेतकऱ्यांना नव्या कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे तसेच कृषी उद्योग व बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने १२ ते १६ मार्च, २०२६ या कालावधीत ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन यूथ फेस्टिवल मैदान, (बळी मंदिर चौक, पार्क साईट शेजारी), नाशिक येथे भरविण्यात येणार असून या पाच दिवसीय कार्यक्रमाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा चे प्रकल्‍प संचालक अभिमन्यू काशिद, यांच्यासह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, कृषी कुंभ प्रदर्शनामध्ये आधुनिक शेतीतील नवकल्पना, कृषी यांत्रिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योग, शासकीय योजना तसेच कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि उत्पन्नवाढ साधता यावी, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन:
संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या कृषी कुंभाचे उद्घाटन महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार आणि वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचा शुभारंभ होईल.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

यावेळी मेघा संजीव बोरसे (नाशिक), विमल जगन आचारी (त्र्यंबकेश्वर), सुनीता राजाभाऊ खेमनार (मालेगाव), श्रद्धा सुनील कासुर्डे (नाशिक), संगीता वाल्मीक सांगळे (येवला), पूनम निवृत्ती डोखळे (दिंडोरी) व लक्ष्मी मधुकर मोरे (सटाणा) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर तसेच सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

एआय तंत्रज्ञान व आधुनिक कृषी दालने:
या प्रदर्शनात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने उभारण्यात येणार आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचे स्वतंत्र दालन हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

👉 ३० एआय स्टॉल्स : ड्रोन तंत्रज्ञान, ‘फसल’ व ‘फायलो’ कंपनीचे स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल तसेच कांदा चाळीसाठी सेन्सर आधारित यंत्रणा.
👉 यांत्रिकीकरण विभाग : ३० हून अधिक स्टॉल्समध्ये आधुनिक कृषी अवजारे व यंत्रसामग्रीचे प्रदर्शन.
👉 शासकीय योजना दालन : विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स असून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  आखाती युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून ESMA लागू

उद्योग आणि समृद्धी: ‘ए’ ते ‘डी’ दालन रचना:
प्रदर्शनात कृषी उत्पादनाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष दालने उभारण्यात आली आहेत.

👉 दालन-बी (निविष्ठा) : खते, बियाणे, कीटकनाशके, ठिबक सिंचन, पॉलिहाऊस आणि शेडनेट याबाबत सविस्तर माहिती.
👉 दालन-सी (अन्नप्रक्रिया व बँकिंग) : ६० अन्नप्रक्रिया स्टॉल्स, २५ मशिनरी स्टॉल्स आणि १० बँकांचे स्टॉल्स. प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मशिनरी निवड, मार्गदर्शन आणि बँक कर्जाची माहिती येथे मिळेल.
👉 दालन-डी (बचत गट व धान्य महोत्सव) : माविम, उमेद आणि आत्मा अंतर्गत महिला बचत गटांची उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. तसेच थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

‘जुगाड ते तंत्रज्ञान’ आणि परिसंवाद:
शेतकऱ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी १२ व १३ मार्च रोजी ‘जुगाड ते तंत्रज्ञान’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत १५ नवकल्पनांची नोंदणी झाली आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर परिसंवाद दररोज आयोजित करण्यात येणार आहेत.

👉 १३ मार्च – द्राक्ष शेतीचा नवा मंत्र व निर्यात क्षमता (पंकज नाठे, अनंत मोरे).
👉 १४ मार्च – डाळिंब शेती व मधमाशी पालन (तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे).
👉 १५ मार्च – कांदा पिकाचे आधुनिक व्यवस्थापन (डॉ. राजीव काळे, डॉ. तुषार आमरे)
👉 १६ मार्च – कृषी क्षेत्रातील एआयचा वापर (गटचर्चा)

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

विशेष म्हणजे दररोज २५ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून एकूण ७५ शेतकरी सन्मानित केले जाणार आहेत.

थेट प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रम:
प्रदर्शनात विविध कृषी तंत्रज्ञानाची थेट प्रात्यक्षिके (Live Demos) आयोजित करण्यात आली आहेत. यात ग्रेप कव्हर, क्रॉप कव्हर, बायोचार, नैसर्गिक शेतीचे ‘१० ड्रम’ मॉडेल, मत्स्य संवर्धनासाठी बायोफ्लॉक तसेच ठिबक ऑटोमायझेशन यांचा समावेश आहे.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १४ मार्च रोजी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि १५ मार्च रोजी ‘फोकलोक’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नाशिककरांसाठी विशेष ‘खाऊ गल्ली’ उपलब्ध असून मिसळ, मांडे, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध असणार आहे.

ग्रामपंचायतींसाठी बस सुविधा:
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतून शेतकऱ्यांना कृषी कुंभ प्रदर्शनाला भेट देता यावी यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक बस उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हाभरातून एकूण १ हजार ३८६ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी, कृषी उद्योजक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790