नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगरमध्ये डेंग्यूने थैमान घातल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी या भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचार्यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगरसह प्रभाग २४ मध्ये घरोघरी तापाने फणफणणारे रुग्ण असून, त्यांची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह नागरिकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बांधकाम साईटवर पाण्याचा साठा असल्याने ही ठिकाणे डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने झाली आहेत.
बांधकामाची माती व इतर साहित्य नाल्याच्या कडेला व रस्त्यावर टाकले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली होती. नगररचनाचे उपअभियंता रवींद्र बागुल, प्रदीप भामरे यांनी गुरुवारी या भागात बांधकाम साईटला भेट दिली. पाणी साठवू नये, माती व इतर मटेरियल रस्त्यावर टाकू नये, अशा सूचना बांधकाम व्यावसायिकांना दिल्या. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी पथकासह या भागात ठिकठिकाणी जावून पाहणी केली. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या सूचना दिल्या.
डेंग्यू संशयित रुग्ण आढळलेल्या इमारतींच्या परिसराची पाहणी केली. डास प्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना कर्मचार्यांना दिल्या. परिसरातील नागरिकांशी चर्चा करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती दिली. डेंग्यू संशयितांची संख्या जास्त असलेल्या भागात घरोघरी जावून माहिती संकलीत करणार असल्याचे त्र्यंबके यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), मगन तलवार, राहुल काळे, घनश्याम सोनवणे, जी. एस. गांगुर्डे आदींसह नागरिक हजर होते. प्रभागात दोन दिवसांपासून डास निर्मूलन मोहीम सुरू झाली असून, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जात आहेत. फवारणी केली जात आहे.
बांधकाम विभाग ढिम्म:
आयुक्तांना निवेदन दिले गेले, शहर अभियंता नितीन वंजारी यांची वेळोवेळी भेट घेवून माहिती देण्यात आली. असे असताना बांधकाम विभाग ढिम्म आहे. कर्मयोगीनगर येथील नाल्यालगत रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढिग गेल्या सहा वर्षापासून हटविले जात नाहीत. रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या साफ केल्या जात नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाचे हेतुपुरस्कर होणारे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. वेळीच दखल घेवून उपाययोजना न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनतर्फे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790