नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नागपूर येथे नुकत्यास पार पडलेल्य ७२ व्या अखिल भारतीय पोलीस हॅण्डबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस हॅण्डबॉल संघाने अंतिम फेरीत पंजाब संघाचा ३६-३० असा फरकाने पराभव करीत विजेतेपदक पटकावत सुवर्णपदक मिळविले. २८ वर्षानंतर महाराष्ट्र पुरुष हँडबॉल संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या संघात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे प्रतिनिधी करणाऱ्या खेळाडूंचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गौरव केला.
नागपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातून २५ राज्यांच्या पोलीस संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यात महाराष्ट्र पोलीस हँडबॉल संघ सहभागी झाला होता. महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात कर्नाटकचा 36 – 19 असा फरकाने पराभव करून सामना जिंकला.
दुसरा सामना केरळविरोधात 36- 23 असा १३ गोल फरकाने महाराष्ट्राने विजय नोंदवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. यात बलाढ्य बीएसएफ संघास महाराष्ट्र संघाने 41- 27 अशा फरकाने विजय नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सीआरपीएफ संघास महाराष्ट्र पुरुष हँडबॉल संघाने अटीतटीची लढत देत 32-31 अशा एक गोलचा फरकाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना सतत तीन वर्ष विजयी असलेल्या पंजाब पोलीस संघाविरोधात झाला. महाराष्ट्र संघाने पंजाब संघास 36-30 असा सहा गोलचा फरकाने सामना जिंकून एक नवीन इतिहास रचत 28 वर्षानंतर महाराष्ट्र पुरुष हँडबॉल संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले.
महाराष्ट्र संघात 16 खेळाडूंपैकी तीन हँडबॉल पुरुष खेळाडू हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे होते. यात पोलीस हवालदार संतोष उशीर, पोलीस नाईक मंगेश जगताप, पोलीस शिपाई योगेश पगारे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्र संघाला विजय मिळविण्यात सिंहाचा वाट घेतला.
खेळाडूंना मार्गदर्शक व हँडबॉल प्रशिक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्फाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. विजय खेळाडूंना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, उपनिरीक्षक विजय लोंढे उपस्थित होत.