नाशिक (प्रतिनिधी): येथील जेलरोड परिसरात असलेल्या शिवाजीनगर भागात अज्ञात चोरट्याने ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथे सागर विलास भावसार यांचे श्री बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार दर्शन दंडगव्हाळ याला दुकानाचे शटर तुटलेले दिसले. त्यानंतर त्याने भावसार यांना ही घटना सांगितली.
भावसार व त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने दुकानात येऊन दुकानाची तपासणी केली असता दुकानातील सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाल्याचे आढळले.
त्यानंतर भावसार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सामनगाव रोड येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या एटीएम मशीनमध्ये सुमारे दहा लाख रुपये होते. परंतु, दोन दिवसानंतरही या घटनेतील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. दुसरीकडे नाशिकरोड परिसरात सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त दिसत नसल्याने चोरट्यांचे फावले जात आहे.
![]()


