नाशिक (प्रतिनिधी): केवळ जिल्हावासीच नव्हे, तर मराठवाड्यातील रहिवाशांचे लक्ष लागून असलेले गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहातही ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, जिल्ह्यातील धरणांमधील एकूण जलसाठा ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणून गंगापूर ओळखले जाते. या धरणात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर नागरिकांची भिस्त असते. या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते.
जूनपासून जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर कमी असल्याने गंगापूरमध्येदेखील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित होता. त्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार होती. परंतु, धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढू लागला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणात ५ हजार ९१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर, धरण समूहात ७ हजार ७७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याशिवाय २४ धरणांमधील एकूण पाणीसाठा ६३ टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या ४१ हजार ३५८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले आहे.