नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घालणाऱ्या कथित ‘पीए’ने एका दांपत्याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२१ ते मे २०२३ दरम्यान घडला. दरम्यान, संशयित ‘पीए’ला गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कथित पीएविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल झाला आहे.
सुशिल भालचंद्र पाटील (रा. लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयित कथित ‘पीए’चे नाव आहे. सुभाष सुरेश चेवले (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांची २०२१ मध्ये संशयित पाटील याच्याशी ओळख झाली. टेलिकॉम व्यावसायिक असलेले चेवले यांच्यासह पत्नीला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष संशयित पाटील याने दाखविले होते.
चेवले यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि स्वत:ची ओळख त्यावेळी असलेल्या मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगितले. चेवले यांनाही ते खरे वाटले. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी त्यांच्याकडून संशयिताने ८० लाख रुपये घेतले. विशेषत: शासकीय सेवेतील उच्चपदस्थ नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रही संशयित पाटीलने दिले.
मात्र, पडताळणी केली असता, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर चेवले यांनी संशयिताकडे पैशांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.
अखेर चेवले यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गंगापूर रोड भागात राहणाऱ्या पाटीलने घर बदलून २०२२ पासून मखमलाबाद भागात वास्तव्य सुरू केले आहे. गंगापूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
पाटील सराईत:
संशयित पाटील याने यापूर्वीही अनेकांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. पाटील याच्याविरोधात २०२३ मध्ये दोन कोटी ७६ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल आहे, तसेच धुळे जिल्हा परिषद (गट ‘क’), महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन, वन विभागासह अनेक विभागांमध्ये नोकरीच्या जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घातला आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.