पुणे। २८ मे २०२५: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 106 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ह्या सरसरीत अंदाजे चार टक्क्यांच्या मर्यादेत चढउतार होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील चारही हवामान उपविभागांमध्येही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाळ्याचा नवा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे मंगळवारी दिल्ली येथे ‘हायब्रीड’ पद्धतीने जाहीर करण्यात आला.
यावेळी मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी माध्यमांसमोर सविस्तर माहिती दिली. एप्रिलमध्ये दिलेल्या प्राथमिक अंदाजात सरासरीच्या 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, ती आता सुधारून 106 टक्क्यांवर पोहोचली आहे. देशाच्या सरासरी मान्सून पावसाचे प्रमाण सुमारे 870 मिलीमीटर इतके असते.
एल निनो आणि आयओडीचा प्रभाव तटस्थ राहणार:
यंदा एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) हे प्रमुख हवामान घटक तटस्थ राहण्याची शक्यता असल्याने, देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे. लडाख, बिहार आणि ईशान्य भारतातील काही राज्ये वगळता, उर्वरित देशात हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहील, अशी माहिती डॉ. महापात्रा यांनी दिली.
त्यांनी यावेळी सांगितले की, देशभरात सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता 89 टक्के इतकी आहे. त्यामुळे कृषी, जलस्रोत आणि पाणीसाठा व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा अंदाज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.