नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): दूध हा मानवी जीवनात महत्वाचा अन्न पदार्थ आहे. शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत होळी सणानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्ता व निर्भेळ दूध मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन नाशिक व दूध भेसळ समिती नाशिक यांच्यामार्फत संयुक्तपणे विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) म.ना. चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या मोहिमेंतर्गत 12 मार्च 2025 रोजी सिन्नर तालुका, सिन्नर चेक पोस्ट व शिंदे-पळसे चेक पोस्ट येथे दुध या अन्न पदार्थाच्या सर्वेक्षण नमुन्यांची मोहिम घेण्यात आली. यात विविध दूध विक्रेते, दूध वाहतूक टँकर, दूध संकलन केंद्र यांच्याकडून दूध अन्नपदार्थाचे 49 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. सदर अन्नपदार्थ प्रयोगशाळेकडून तपासून घेण्यात येणार असून त्यांच्या अहवाल प्राप्तीनंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासोबतच या व्यवसायासाठी कायद्यानुसार आवश्यक असलेले परवाना व नोंदणी यांचीही तपासणी करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही सह आयुक्त श्री. चौधरी व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांचया मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी, विनोद घवड, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, सुहास मंडलिक, संदीप तोरणे, गोपाल कासार, गोविंद गायकवाड, अमित रासकर, अश्विनी पाटील, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी योगेश नागरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग अनंत साखरे, वजन व मापे निरिक्षक वाघ यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
सदर मोहीम पुढेही सुरू असणार असून दूध या अन्न पदार्थात भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना दूध भेसळीबाबत माहिती असल्यास FSSAI च्या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही सह आयुक्त चौधरी यांनी केले आहे.