नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२५: दसरा, दिवाळी सण जवळ आल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोतील एका दुकानावर धाड टाकून सुमारे ४३ हजार रुपये किमतीचा जवळपास १५० किलो बनावट पनीरचा साठा जप्त करून नष्ट करण्याची कारवाई केली आहे.
सिडकोत बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे सहआयुक्त दिनेश तांबोळी यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त मनीष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, उमेश सूर्यवंशी, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने सिडको येथील मे. विराज एंटरप्रायजेस, त्रिमूर्ती चौक, सिडको या पेढीवर छापा मारला. या पथकाने पेढीची तपासणी करून तेथे विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा साठा आढळून आला. ३८ हजार ७०० रुपये किमतीचा १२९ किलो पनीरचा साठा आणि ५ हजार ४० रुपये किमतीचा १८ किलो खवा असा ४३ हजार ७४० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर व खना या दोन अन्न पदार्थाचे अन्न नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेला संशयित पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व ते परत खाण्याच्या उपयोगात येऊ नये म्हणून त्यावर नीळ टाकून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला. अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
या टोल फ्रीवर तक्रार करा:
सण-उत्सव काळात पनीर, पेढे, बर्फी, मिठाई आदी खरेदी करताना ते दुधापासून बनविले असल्याची खात्री करून दक्षता घ्यावी, तसेच तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त दिनेश तांबोळी यांनी केले आहे.
![]()

