नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्त गणेश प्रसाद आरोटे यांच्यासह अजय आहुजा आणि खासगी सल्लागार मंगलकर यांना दोन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) गुरुवार (दि. २८) रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने १ जानेवारी २०२४ पर्यंत पोलिस कोठडी
सुनावली आहे. नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील तक्रारदार उद्योजकाकडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील लाचेच्या मागणीप्रकरणी शनिवारी (दि.२३) तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीत ईपीएफओ अधिकारी अजय आहुजा व सल्लागार मंगलकर यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे म्हटले होते.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे महासंचालक डॉ. सदानंद दाते, मुंबई व नाशिकच्या सीबीआय-एसीबीच्या पथकाने सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सापळा रचत तक्रारदाराकडून मंगलकर याने २ लाख रुपये स्वीकारले असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याने आरोटे व आहुजा यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम घेतल्याची माहिती दिल्यानंतर पथकाने गणेश आरोटे, अजय आहुजा यांनाही अटक केली.
काय आहे नक्की प्रकरण:
तक्रारदाराने ईपीएफओ अधिकारी यांच्याकडे बँक खाते विवरण सादर केले होते. या प्रकरणाची आहुजा यांनी चौकशी केली. तक्रारदाराकडे पुन्हा आहुजा यांनी तक्रारदाराला एकूण १० लाख ५० हजार रुपये पीएफ भरला नाही असे सांगून २ लाखांची लाचेची मागणी करून प्रकरण थांबवितो असे तक्रारीत म्हटले आहे. लाचेची रक्कम मंगलकर यांनी दोघा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून स्वीकारली. यामुळे पथकाने भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्त गणेश आरोटे, अधिकारी अजय आहुजा यांनाही अटक केली.
आधी फोन रेकॉर्डिंग केला मग रचला सापळा:
सीबीआयच्या एसीबी पथकाकडे तक्रार प्राप्त होताच त्यांनी आयुक्त आरोटे, आहुजा व मध्यस्थ मंगलकर व तक्रारदार यांच्यातील फोन रेकॉर्डिंग करून मागणी मान्य झाल्याचे लक्षात येताच बुधवारी रात्री कार्यालयाच्या आवारातच सापळा रचून मंगलकर व आहुजा यांना अटक केली. या दोघांच्या चौकशी अंती रात्री उशिरा आयुक्त आरोटे यास अटक करण्यात आल्याचे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.