नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लासलगाव येथील डॉक्टरचे अपहरण करून लूट करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या जाळयात सापडली असून या मोस्ट वॉन्टेड आरोपींनी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हयात विविध गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर (ता. निफाड) येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम. आय. डी. सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून जाऊन मारहाण व दमदाटी केली व त्यांचे खिशातील पैसे, एटीएम कार्ड, मोबाईल फोन जबरीने काढून घेवून, एटीएम कार्डद्वारे त्यांचे बँक खात्यातील रक्कम काढून घेतली.
तसेच त्यांचेच शर्टाने त्यांचे हात पाय बांधून तोंडात कोंबून निर्जनस्थळी सोडून देवून त्यांची अल्टो कार संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरी करून सुमारे 2 लाख 65 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जरबरीने चोरून नेल्याबाबत लासलगाव पोलीस ठाणेस गुर.नं 248/2023 भा. दं .वि .कलम 394, 365, 341, 34 सह आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे यांनी सदर घटनेचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर गुन्हयाचे कार्यक्षेत्र व आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, तसेच यातील फिर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन यावरून गोपनीय माहिती काढून, सदर गुन्हा हा नैताळे येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण पिंपळे व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे खात्रीशीररित्या समजले.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवून, बीड जिल्हयातील आष्टी व नगर जिल्हयातील जामखेड परिसरात दोन दिवस सापळा रचून स्थानिक पोलीसांचे मदतीने कुख्यात गुन्हेगार 1) श्रावण उर्फ श्रावण्या सुरेश पिंपळे, वय 26, रा. नैताळे, ता. निफाड, जि. नाशिक यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार 2) नितिश मधुकर हिवाळे, वय 32, रा. राजुर रोड, पीर पिंपळगाव, जि. जालना, 3) सचिन शिवाजी दाभाडे, वय 25, रा. गोरक्षनाथनगर, हरसुल, जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी नितिश हिवाळे व सचिन दाभाडे यांना जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास लासलगाव लासळगावचे स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनखाली सुरु आहे.