Crime News: घराच्या वादातून मायलेकाला कारखाली चिरडले, दोघांचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये घराशेजारच्या असलेल्या जागेच्या मोजणीच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कुंभार गल्लीत ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेत शीतल अजित येणारे (२७) व स्वराज या मायलेकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कारचालक किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.

पारनेरमध्ये श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब हे एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांच्या घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबांत गेल्या काही दिवसांपासून वाद होता. या वादात किरण श्रीमंदिलकर येणारे कुटुंबाला नेहमी जिवे मारण्याची धमकी देत होता. ही धमकी खरी ठरवत त्याने हे संतापजनक कृत्य केले आहे.

भरधाव कार अंगावर घातली:
गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शीतल आपल्या अडीच वर्षांच्या स्वराज या मुलाला घरासमोरच्या जागेत जेवण भरवत होत्या. त्याच वेळी किरणने भरधाव कार त्यांच्या अंगावर घातली. मोठा आवाज आल्याने शीतलच्या सासू चंद्रकला बाहेर आल्या. कारखाली शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

उपचारा दरम्यान मृत्यू:
या घटनेनंतर शीतलला नगर येथील शासकीय रुग्णालयात, तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शीतलचा गुरुवारी रात्री नऊ वाजता, तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790