नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी त्यांना मतदानासाठी आवश्यक त्या सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहेत. त्यासाठी गठित समितीतील प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता दिव्यांग मतदारांसाठी सुलभ मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करणेसंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या दालनात झाली. यावेळी त्यानी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेल्या सूचनांची सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या ६५ हजार ५३९ आणि दिव्यांग मतदार २३ हजार ३५८ अशी एकूण ८८ हजार ८९७ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदाराना सुलभरित्या पोहोचता यावे व विनाप्रयास मतदान करण्याची प्रक्रिया सुलभ असावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संनियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सक्षम ऍपवर नोंदणी करावी. त्यानी आवश्यक सुविधेची मागणी ऍपवर केल्यास मतदानादिवशी त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे. तसेच यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर रैंप, व्हीलचेयर, मदतीसाठी स्वयंसेवक, मतदानासाठी रांगेत उभा राहावे लागू नये यासाठी प्राधान्यक्रमाने मतदानाची सुविधा, पेयजल, निवारा, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा आदि प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अनुषंगाने समितीतील सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचना आहेत. या बैठकीस आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.