नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव शहर व परिसरात गेली दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर आल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. शहरात सोमवारी (ता. १) मात्र पुन्हा एकदा या हंगामातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले होते. शहरात आज कमाल ४२ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील काही दिवसापासून मालेगावच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सूर्याने आग ओकण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत असून उकाड्याने नागरिक हैरान झाले आहे. आता पुन्हा तापमानात वाढ होत असून येथील तापमान हे राज्यात सर्वाधिक ठरत आहे.
यापूर्वी २७ मार्चला सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वाढत्या उन्हामुळे शहरात दुपारनंतर रस्त्यांवर वर्दळ मंदावत आहे. तसेच उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कुल्फी, लिंबू सरबत, शिकंजी, आईस्क्रीम, बर्फगोळे, रसवंतीगृहांवर मोठी गर्दी होवू लागली आहे. कडाक्याच्या उन्हापासून संरक्षणासाठी उपरणे, टोपी, गॉगल आदींची विक्री वाढलेली होती. महामार्ग व राज्य रस्त्यांवर टोपी, उपरणे, रुमाल, गॉगल विक्रीची दुकाने जागोजागी आढळून आली.