नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात 18.71 टक्के ऑक्सिजन बेड भरलेले असून पॉझिटिव्हिटी दर ७.७५ टक्के असल्याने नाशिक जिल्हा हा तिसऱ्या स्तरात मोडतो. मात्र याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यावर विचार विनिमय करण्यात येऊन फेरबदल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
आज (दि. ५ जून) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेट मध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्ण संख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल 3 प्रमाणे निर्बंध ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.
लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश यथाशीघ्र पारित करण्यात येतील व सोमवार पासून लागू होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये अंशत: बदल
तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सायंकाळी 5 वाजेनंतर संचारबंदी लागू राहील. याचप्रमाणे शनिवार व रविवारसाठी सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. याबाबत जिल्हा प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत स्वतंत्ररित्या आदेश जारी करण्यात येणार आहेत. अधिकृत आदेश जारी होईपर्यंत कोणत्याही अफवांवर अथवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना केले आहे.