महत्वाची बातमी: नाशिक जिल्ह्यात 1 जूनपासून कुठले निर्बंध शिथिल होणार.. जाणून घ्या..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 8.11% आहे व ऑक्सीजन बेड 40 टक्केपेक्षा कमी वापरात असल्यामुळे आपला नाशिक जिल्हा निर्बंध शिथिल करण्यासाठी पात्र आहे. परंतु एकंदरीत सर्वसाधारण परिस्थिती पाहून नेमके कोणते निर्बंध शिथिल करायचे व किती प्रमाणात शिथिल करायचे याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक उद्या (दि. ३१ मे २०२१) घेऊन त्यात विचार करून सविस्तर आदेश उद्या सायंकाळपर्यंत काढले जातील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कळविले आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू:
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील:
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.

मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील , अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790