नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज दुपारच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काहीसे ऊन देखील पडले होते. मात्र, यानंतर चार वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ढग दाटून आले व त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास पावसाने नाशकात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो आज खरा ठरला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले. मात्र, या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. मनमाडमध्ये सुद्धा गारांचा पाऊस झाला आहे.
दरम्यान, अजून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हिवाळी मोसमी व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.
गोदाघाटावर अडकली चारचाकी वाहने; अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व जीवरक्षक दल धावले मदतीला:
गंगापूर धरणातून जायकवाडी साठी सोडण्यात आलेल्या पाण्याने वाहनतळावर चारचाकी वाहने अडकल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच जीवरक्षक दलाच्या युवकांनी ही वाहने सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली.पाण्याची पातळी वाढणार असल्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने शनिवारी दिल्या असल्याचे सांगितले जात असले तरी अशा सूचना दिल्या गेल्या नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
पाण्याची पातळी मर्यादित असल्याने वाहने वाहून जाण्याची शक्यता नसली तरी ती बाहेर काढणे अवघड होतं असल्याने अग्निशामक दलाची मदत घेऊन वाहने सुखरूप बाहेर काढण्यात आली.