नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गोदावरीला पहिला पूर; जनजीवन विस्कळीत !

नाशिक, १९ जून २०२५: नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या मोसमातील पहिला पूर गोदावरीला आला आहे. रामकुंड परिसरात पुराचे पाणी मंदिरांमध्ये शिरले असून, रोकडोबा मैदानाजवळ पार्क केलेली चारचाकी गाडी पाण्यात अडकली.

शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. जुने नाशिक, नवीन नाशिक, नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड व देवळाली परिसरात रस्त्यांचे तळ्यात रूपांतर झाले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

गोदावरीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने ऐतिहासिक दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने नाशिकसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महापालिका व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाले असून, नदीकाठच्या भागांतील नागरिकांना सुरक्षित राहण्याचा आणि नदीकिनारी वाहने न पार्क करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीच्या जलपातळीवर प्रशासन सतत नजर ठेवून आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाने हाहाकार:
संध्याकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाने धडक दिली. काही तासांतच गावातील सखल भाग जलमय झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, परिणामी नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. परिसरातील शेतजमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही भागांतील सुपीक मातीच वाहून गेली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

इगतपुरी तालुक्यातही जनजीवन विस्कळीत:
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत मागील तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः हजेरी लावली आहे. पावसामुळे भात लागवडीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी, नागरिकांचे जनजीवन मात्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बाजारपेठांमध्ये सामसूम पसरली असून, अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी विजेचे पोल कोसळले, तर केबल तुटल्याने १० ते १२ तास वीज नसल्याने पाणीपुरवठाही खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना पावसातही पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

सतर्कतेचा इशारा:
महापालिकेसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या भागांतील रहिवाशांनी विशेष सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here