नाशिक (प्रतिनिधी): महिनाभराच्या बंधनांनंतर नाशिक शहरातील निर्बंध अखेर १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नवी नियमावली जाहीर केली.
त्यानुसार अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह अन्य काही सेवांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, वेळेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या पुन्हा वाढून नाशिक रेड झोनमध्ये आल्यास सर्व सेवांवर नाईलाजास्तव बंदी घालावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे.
या सेवा राहणार सुरू, वेळेचीही मर्यादा:
सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सेवांना परवानगी. सार्वजनिक ठिकाणी दुपारी ३ ते पहाटे ६ पर्यंत फिरण्यास मनाई. अत्यावश्यक सेवांना सवलत. गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार मात्र राहणार बंद. दूध विक्रीसाठी पूर्वीसारखीच सवलत. रेशन दुकाने शासकीय वेळेनुसार सुरू राहतील. शिवभोजन थाळीचा लाभही सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत पार्सल स्वरूपात घेता येईल
हॉटेल्स, फूड मॉल, अन्य खाद्यपदार्थांची दुकाने पार्सल स्वरूपात उपलब्ध (सकाळी ७ ते १ आणि संध्याकाळी ५ ते ८). अंत्यविधीसाठी २० लोकांची मर्यादा, त्यानंतरच्या विधींसाठी १५ लोकांच्या उपस्थितीची मर्यादा. शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थिती राहणार. कृषीविषयक साहित्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहतील. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, सोहळे यांवर बंदी कायम. लग्न केवळ रजिस्टर पद्धतीने ५ लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
क्रिडांगण, उद्याने, जलतरण तलाव, जीम, नाट्यगृह, चित्रपट गृह बंदच राहणार. खासगी क्लासेस, शाळा केवळ ऑनलाईन सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला विक्रीला परवानगी. अत्यावश्यक सेवा वगळता वीकेण्ड लॉकडाऊन कायम राहणार. बँक, पोस्ट कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ या वेळात खुली राहणार. सलून, पार्लर पुरेशी काळजी घेत सुरू करण्यास मान्यता. स्पा मात्र बंदच राहणार. रात्रीची संचारबंदी कायम राहणार. नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजारांचा दंड होणार. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. फक्त वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकाने, दुध, वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांची विक्री सुरु राहील. तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंट, फूड स्टॉल्स मधील अन्न पदार्थांची फक्त होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील. जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी इ-पास गरजेचा असेल.