नाशिक (प्रतिनिधी): कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मालेगावसह ग्रामीण भागामध्ये ऑक्सिजन रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहे. त्याअनुषंगाने संबधित अधिकाऱ्यांनी नियोजन करुन कोरोनाबाधित रुग्णाला आवश्यकतेनुसार रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत कृषीमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, मालेगांव अपर जिल्हाधिकारी धंनजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार, उपस्थित होते.
कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मालेगाव शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्ण मालेगांवमध्ये उपचारसाठी येतात. त्यामुळे मालेगाव येथील खाजगी व कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी तात्काळ ड्युरा सिलिंडर व जम्बो सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात यावेत. सामान्य रुग्णालय, मालेगांव व ग्रामीण रुग्णालयात मानधन तत्वावर तत्काळ कर्मचारी भरण्यात यावेत, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकित सांगितले.
ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगीत उपचार घेणे शक्य होणार नसल्याने डी.सी.एच.सी सक्षम करण्यात याव्यात. देवळा, नांदगावं ,मनमाड आणि नामपूर येथे कोविड सेंटर सुरु करण्यात यावे. मनमाड येथील रुग्ण उपचारासाठी मालेगांव येथे जात असल्याने मनमाड येथील आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात. ग्रामीण भागात घरुन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी गावपातळीवर शाळा, मंगल कार्यालय ताब्यात घेवून त्याठिकाणी रुग्णांवर उपचार देण्यात यावे, असेही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
मालेगांवसाठी प्रस्तावित असलेल्या 20 केएल ऑक्सिजन टँकचे काम लवकरात लवकर सूरु करण्यात यावे. रेमडेसिव्हिर पुरवठा थेट कोविड रुग्णालयांनाच करण्यात येणार असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी विविध कंपन्यांचे इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलिंडर हे मेडीकल सिलिंडर म्हणून वापरता येवू शकतील का, याबाबत तात्काळ तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून तशी माहिती सादर करण्याची सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी एक लिक्विड टँक शासनाकडून उपलब्ध करुन मिळण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकित केली. इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलिंडर हे मेडीकल सिलिंडर म्हणून वापरण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून तशी कार्यवाही करण्यात येईल. तसेच रेमडेसिव्हिरचा पुरवठा प्राधिकृत वितरकाकडून केवळ कोविड रुग्णालयांनाच होणार असल्याने रेमडेसिव्हिरच्या अवाजवी वापराला आळा बसणार आहे. जिल्ह्यातील कोविडचे उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा होणारा वापर लक्षात घेता, नोडल अधिकाऱ्यामार्फत खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा व ऑक्सिजनच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी कृषीमंत्री भुसे यांना दिली.