नाशिक: फटाक्यांचा आवाज ‘इतक्या’ डेसीबलपेक्षा जास्त नसावा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आगामी काळात दिवाळीसह विविध सण साजरे केले जाणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत, जेथे वस्ती व वर्दळ नाही, अशा ठिकाणी उडवावेत. कोणत्याही परिस्थितीत फटाक्यांचे आवाज हे १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावेत, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे की, 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात दीपावलीचा सण साजरा होईल. या कालावधीत नागरिक फटाके उडवितात. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनि व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत व पर्यावरण (संरक्षण) कायद्यांतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारित नियम जे फटाक्यांच्या आवाजाच्या मानकांबाबत आहेत व त्याबाबतची काटेकोर अंमलबजावणीबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे, शोभेचे दारू काम निष्काळजीपणाने करणे आदी संभाव्य कृत्यांमुळे जनतेच्या जीवितास व मालमत्तेस हानी होण्याची शक्यता असल्याने, अशा प्रकारची हानी निर्माण होऊ नये यासाठी व रहदारीच्या नियमनासाठी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश काढणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई पोलिस अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (पोलिस आयुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून) पुढील अधिसूचना पारीत करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आचारसंहितेबरोबरच शहरात पंधरा दिवस मनाई आदेश

या अधिसूचनेनुसार स्फोटक अधिनियमातील ७८ ते ८८ नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फटाका उडविणाऱ्या जागेपासून ४ मीटरपर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरासाठी बंदी घालण्यात आली आहे. संबंधित परवाना प्राधिकारी यांनी फटाका परवाना देताना तो गर्दी, वर्दळ, सार्वजनिक रस्ता, शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळाशेजारी न देता अन्यत्र मोकळ्या जागेत, असेल अशा ठिकाणी अशा ठिकाणी देण्याची कार्यवाही करावी. साखळी फटाक्यांसाठी नमूद केलेल्या आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत ५ Log १० (N) डेसीबलपर्यंत शिथिलता देण्यात येत आहे. ज्यात N= एका साखळी फटाक्यातील एकूण फटाक्यांची संख्या ५० फटाके, ५० ते १०० आणि त्यावरील फटाके असतील, तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्य जागेपासून चार मीटरपर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसीबल एवढी असावी.

रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी आहे. (त्यात ३० डिसेंबर २०२३ रोजी दिलेली सूट वगळून). फटाक्यांची दुकाने जमिनीलगतच असावीत. प्रत्येक स्टॉलमध्ये ५० किलोग्रॅम फटाके व ४०० किलोग्रॅम चायनीज क्रॅकर (शोभेचे) यापेक्षा जास्त साठा असणार नाही. प्रत्येक स्टॉलमध्ये अंतर सुरक्षित असावे. तसेच कुठल्याही सुरक्षित घोषित केलेल्या सीमेपासून ५० मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी. एकापेक्षा जास्त स्टॉल असतील, तर त्यांचे प्रवेशद्वार समोरासमोर नसावे. एका ठिकाणी १०० पेक्षा जास्त स्टॉल नसावेत. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त समूह होत असतील, तर दुसऱ्या प्रत्येक समुहातील अंतर ५० मीटरपेक्षा कमी नसावे. स्टॉलच्या ठिकाणी तेलाचा दिवा, मेणबत्ती निषिद्ध आहे. विद्युत प्रवाह वायरिंग योग्य रितीने केलेली आहे याकडे विशेष लक्ष द्यावे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

फटाक्यांच्या दुकानाचा आपत्कालिन मार्ग हा नेहमी खुला असावा. त्यात कुठल्याही प्रकारचे अडथळे नसावेत. तसेच स्टॉलच्या ठिकाणी धूम्रपानास सक्त मनाई करणे बंधनकारक आहे. फटाके हाताळणीसाठी पुरेशी जागा असावी. दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही प्रकारचा अपघात निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था व अग्नि प्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी.

खराब स्थितीत असलेल्या कुठल्याही फटाक्यांची विक्री होणार नाही याचीही दक्षता संबंधितांनी घ्यावी. २५ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे, ३.८ सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे व ऍटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेले फटाके विक्री केली जाणार नाही. तीन इंचापेक्षा जास्त लांबीचा आणि अर्ध्या इंचपेक्षा जास्त व्यासाचे कागदाच्या नळीपासून केलेला गन पावडर व नायट्रेट मिश्रित परंतु क्लोरेट नसलेल्या चिनी फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. फुटफुटी किंवा तडतडी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखले जाणाऱ्या पिवळा फॉस्फरसयुक्त असलेल्या अत्यंत विषारी असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. १८ वर्षांखालील मुलांसमवेत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय त्यांना फटाके विक्री करू नये.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

फटाका दुकानातील विक्रेते व कामगारांना फटाक्यांच्या घातक स्वरूपाबद्दल तसेच फटाके सुरक्षिततेच्या दृष्टीने कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण द्यावे. शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करू नये. शांतता क्षेत्रात रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये आदींच्या सभोवतालचे १०० मीटर पर्यंतचे क्षेत्र येते. रॉकेट डोक्याचा भाग हा १० सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचा नसावा व २.५ सेंटीमीटर पेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा. मनाई केलेले आपटबार व उखळी दारू उडविण्यास बंदी आहे. १० हजार फटाके पेक्षा जास्त लांबीच्या फटाक्यांची माळ असता कामा नये. त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास मुंबई पोलिस अधिनियमाच्या विविध कलमान्वये आठ दिवसांपर्यंत एवढ्या कारावासाची शिक्षा किंवा रुपये १२५० (एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत) वाढविता येवू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

किरकोळ फटाके विक्री करणाऱ्या परवानाधारकांनीही या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत जेथे वस्ती व वर्दळ नाही, अशा ठिकाणी उडवावेत. कोणत्याही परिस्थितीत फटाक्यांचे आवाज हे १२५ डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये, असेही जिल्हादंडाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790