नाशिक: अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांचे निर्देश

नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२५: अतिवृष्टीमुळे नाशिक विभागात झालेल्या घरे, पशुधन आदींच्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करुन त्याची मदत बाधितांना तात्काळ मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करा. तसेच, पावसामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या नागरिकांच्या निवारा तसेच अन्नपाण्याची तात्काळ व्यवस्था करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. याशिवाय, शेतपीकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत विनाविलंब मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आदी यावेळी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

डॉ. गेडाम म्हणाले की, विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचही जिल्ह्यातील काही भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक साहित्याचे आणि घराचे नुकसान झाले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांचे पशुधनही या अतिवृष्टीमध्ये मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वप्रथम या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्राधान्य देणे, त्यांना निवारा आणि जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करणे आदी बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांना तात्काळ या गोष्टींची मदत होईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पशुधनाचेही नुकसान झाले आहे. या बाधित नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले. अशा नुकसानीसाठी उणे प्राधिकारपत्रावर अनुदान वितरित करण्यास यापूर्वीच शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वेगळ्याने अनुदान प्राप्त होण्याची वाट न पाहता तात्काळ मदतीची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

याशिवाय, शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पंचनाम्यानंतर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर विनाविलंब ती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होईल, यापद्धतीने कार्यवाही करावी. त्यासाठी जी माहिती आवश्यक आहे, ती आताच जिल्हा प्रशासनाने जमा करुन ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जून ते ऑगस्ट 2025 अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचे अनुदान यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत 90 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत अनुदान वाटपास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790