नाशिक। दि. २८ सप्टेंबर २०२५: बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाने भीषण तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेतातील उभी पिके व पोल्ट्री फार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरांचे छप्परही उडाले आहेत.
शनिवारी (दि. २७) संध्याकाळी आलेल्या वादळी पावसामुळे गोराणे गावातील निर्मलाबाई नामदेव सोनवणे (वय: ३०) आणि देवचंद गोपाळ सोनवणे (वय: ८०) यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला. तर टेंभे खालचे येथील कस्तुराबाई भिका अहिरे (वय: ७५) यांचा भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.
टेंभे, आखतवाडे, गोराणे, मोराणे आदी गावांमध्ये शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीजेचे खांब कोसळल्याने काही भाग अंधारात बुडाला आहे. अनेक कुटुंबांची घरे व पोल्ट्री फार्मची संरचना कोसळली आहे. दरम्यान, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी सकाळी घटनास्थळांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वन केले तसेच प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
![]()

