नाशिक: रब्बी हंगामासाठी शेतकरी व पाणीवापर संस्थांनी 6 जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत

नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२६: नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्र अंतर्गत येणारे कालवे, कालवा प्रकल्पांचे लाभक्षेत्र, जलाशय, बंधारे व नदी या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाचे पाणी घेवू इच्छिणारे शेतकरी व पाणी वापर संस्थांनी 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे व रितसर पोहोच घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत गंगापूर डावा तट कालवा, गोदावरी उजवा व गोदावरी डावा तट कालवा, आळंदी डावा व आळंदी उजवा तट कालवा, पालखेड उजवा तट कालवा, कडवा तट कालवा, भोजापूर डावा कालवा या सर्व प्रकल्पांचे लाभक्षेत्र तसेच वाकी, भाम, भावली, दारणा, मुकणे, वालदेवी , गंगापूर, कडवा, भोजापूर, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणाचे जलाशय व नदी यावरून तसेच दारणा-गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागांच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापूर बंधाऱ्यांचा समावेश होतो.

वरील प्रकल्पांत सिंचनासाठी उपलब्‍ध असणारे पाणी विचारात घेवून काही ठराविक क्षेत्रापर्यंत नमुना नंबर ७ प्रवर्गात रब्बी हंगाम सन २०२५-२६ साठी संरक्षित सिंचनाकरीता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकराच्या उभ्या पिकांसाठी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. शासन धोरणानुसार धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळी हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यात पाणीपुरवठा करताना आर्वतन कालावधीत कमी जास्त अंतर करून पुरवावे लागते. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व सूक्ष्म सिंचनावर अधिक भर द्यावा.

पिकांना काही कारणास्तव कमी- अधिक पाणी मिळून नुकसान झाल्यास याबाबत कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेवूनच अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी नजिकच्या सिंचन शाखेशी अथवा नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790