नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदार संघांत सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक तयारी व कामकाजाचा आढावा भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त चारही निवडणूक खर्च निरीक्षक यांनी आज घेतला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्षाच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून 20 दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी श्रीमती निधी नायर (आयआरएस) व मुकंबीकेयन एस. (आयआरएस) यांची तर 21 नाशिक या लोकसभा मतदारसंघासाठी सागर श्रीवास्तव (आयआरएस) व प्रवीण चंद्रा (आयआरएस सी अँड सीई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारही खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून, त्यांनी आज निवडणूक प्रक्रियेचा संयुक्त आढावा घेतला.
भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक जबाबदारीसाठी सूक्ष्म मार्गदर्शक सूचना, कृती आराखडा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येकाने त्याला नेमून दिलेली जबाबदारी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे, चोखपणे व गांभीर्याने पार पाडावी. कोणतीही तक्रार येऊ देऊ नये. संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवावी. अचूकतेने व पूर्ण क्षमतेने काम करावे, अशा सूचना यावेळी चारही खर्च निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणूक सुरळीतपणे पार पाडू, असा विश्वास खर्च निरीक्षकांना दिला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली.
निवडणूक कामकाज व तयारीची माहिती याबाबत नोडल अधिकारी (खर्च) भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील मतदार संघ, मतदान केंद्रे, विविध कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी, विविध पथके आदिंची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी कार्यालयच्या नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक, नोडल अधिकारी आदि उपस्थित होते.
प्रारंभी चारही खर्च निरीक्षकांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वागत केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी आभार मानले.