
नाशिक। दि. २५ जून २०२५: देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे, उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर, रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह मान्यवरांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणीबाणीत कारावास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे. अशा प्रकारचे उपक्रम भारतीय लोकशाही आणखी सक्षम आणि बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. लोकतंत्र सेनानी संघाने केलेल्या मागण्यांबाबत राज्य शासनाला अवगत करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे सांगितले.

श्री. शेटे, भानुदास येवला, दिनकर देशमुख, जयश्री कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार, दामोदर गौरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, आणीबाणी अचानक जाहीर झाली. लोकशाहीसाठी अनेकांनी सत्याग्रह केला. या कालावधीत अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. भारतीय राज्य घटनेचा दुरुपयोग झाला. त्यानंतर जनमत विरोधात गेल्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेण्यात येऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्याचे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वाघ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री. साळुंखे यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता:
आजच्या या सत्कार सोहळ्यास धुंडिराज होनप यांच्यासह अन्य एक वयोवृद्ध व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील मुख्यमंत्री सहायता कक्ष येथे थांबले होते. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी तेथे जाऊन श्री. होनप यांचा सत्कार केला.