
नाशिक, दि. २५ मे २०२५: नाशिक जिल्ह्यात आज मान्सूनच्या आगमनानंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिन्नर शहरात मोठी दुर्घटना घडली. येथील हायटेक बसस्थानकाच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक तत्काळ रिकामे करण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातही मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसत आहे. याच दरम्यान सिन्नर बसस्थानकातील ही घटना घडली. पावसामुळे ही धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी स्लॅब कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सदर घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. तसेच, सिन्नर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा उपस्थित असून, पुढील धोका टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.