जिल्ह्यातील एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी नोंदविला सहभाग
नाशिक। दि. २४ जुलै २०२५: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८९ शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत ३१ जुलै २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२५- २६ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातून २२ जुलै २०२५ अखेर १ लाख ६२ हजार ८९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील काही भागात सध्या पावसामुळे मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. पेरणी झालेल्या भागात सततच्या पावसामुळे पीक नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विमा योजनेत १३ पिकांचा समावेश:
जिल्ह्यात भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, कापूस, मका, तूर, उडीद, खुरसणी, खरीप कांदा या १३ पिकांचा समावेश या योजनेत आहे. शासनाने अत्यल्प विमा हप्ता निश्चित केला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे. ते वैयक्तिक अर्ज करून किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून सहभाग नोंदवू शकतात. अर्जाचे विहित नमुने बँक, विमा कंपनी, सार्वजनिक सुविधा केंद्र, टपाल कार्यालय, कृषी विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी आपला विमा हप्ता तत्काळ भरून अंतिम मुदतीपूर्वी या योजनेत सहभागी व्हावे.
ई पीक पाहणी, फार्मर आयडी आवश्यक:
सुधारित पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. या योजनेत ई पीक पाहणी व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.