
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल. आगामी काळात कलाग्राम महत्वाचे पर्यटन केंद्र होईल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मंत्री भुजबळ यांनी आज सकाळी कलग्रामच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ, पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता महेश बागूल, सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, ग्रामविकास विकास अधिकारी डी.एन.पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम निर्माण करण्यात आले. त्यासाठीस आता पर्यटन विभागाने ४.९० कोटी रुपये निधी मंजूर केला असून काम पूर्ण होत आहे. व्हिलेज संकल्पनेवर असलेल्या या कलाग्राममध्ये ९९ गाळे आहेत. शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचतगट, मूर्तिकार यासह विविध कला सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कलाग्राम जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याठिकाणी हंगामानुसार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी येथील गाळे नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावेत . बोट क्लब प्रमाणे हेही एक महत्वाचे पर्यटन केंद्र निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर मंत्री भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी केली.
![]()

