नाशिक, दि. 21 मे, 2025: सेवायोजन कार्यालये सुधारित करून पूर्ण क्षमतेने चालविण्यासंदर्भात शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्याजकता व नाविन्यता विभागाने दिलेल्या निर्देशान्वये सेवायोजन कार्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील 10 वी उत्तीर्ण व त्यावरील विविध पात्रताधारक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक च्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ज्या उमेदवारांना स्वत: ऑनलाईन नोंदणी करता येणे शक्य नाही, अशा उमदेवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, आयटीआय सातपूर परिसर, पहिला मजला, त्र्यंबकरोड, नाशिक या कार्यालयात शैक्षणिक पात्रतेच्या सर्व प्रती, आधार कार्ड व इतर आवश्यक प्रमाणपत्रांसह सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत प्रत्यक्ष स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करावी.
नोंदणी केलेलेल्या उमेदवारांना विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळावे, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, नाविन्यता विषयक (Innovative ideas) इत्यादी विविध योजनांमध्ये सहभागी होता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.