येवला कृषि उत्पन्न बाजार समितीत लवकरच शेतकरी भवन निर्माण करणार – छगन भुजबळ

नाशिक। दि. १८ ऑक्टोबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा): येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी १.५० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने सादर करावा. यासोबतच कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत असलूयाचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहायक निबंधक श्री.राजपूत, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुणमामा थोरात, वसंत पवार, संभाजी पवार, येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, रायभान काळे, माजी सभापती किसन धनगे, संचालक संजय बनकर यांच्यासह सभासद, नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

मंत्री भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय कार्यालय चांगले असले पाहिजे. त्यादृष्टीने हे तयार केलेले कार्यालय हे फक्त एक कार्यालय नाही, तर ती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय आहे. येवला बाजार समिती ही केवळ व्यवहार करणारी संस्था नाही, तर ती शेतकऱ्यांच्या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. शेती क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शेतमालाची गुणवत्ता, साठवण, वाहतूक आणि विपणन या सगळ्या गोष्टींमध्ये नव्या तंत्रज्ञानाची आणि सुविधा विकासाची गरज आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन येवला बाजार समितीच्या शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण व्हावे, त्यांना योग्य भाव मिळावा, त्यांचे उत्पादन सुरक्षित राहावे ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे. येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचा डोंगरगाव येथे उपबाजार सुरु करण्यात आला आहे. या उपबाजारासाठी आवश्यक ती जमीन आपण उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता बाजार समितीपर्यंत दुरचा प्रवास करावा लागणार नाही. त्यांना त्यांच्या भागातच बाजारपेठेची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अंदरसूल उपबाजारात कांदा लिलाव स्थळाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात शेतमाल भिजून नुकसान होऊ नये यासाठी निवारा शेडची कामे देखील सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टळेल आणि व्यवहार सुरळीत पार पडतील असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

येवला तालुक्याचा कृषी माल केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागात पोहोचावा, यासाठीही आपले प्रयत्न सुरु आहे. यासाठी येवला आणि नगरसूल रेल्वे स्थानकात “गुड्स शेड” उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेला येवला स्थानकातून अधिक बोग्या जोडून गाड्यांना थांबा मिळावा यासाठी देखील आपण रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. हा निर्णय झाला की, शेतकऱ्यांचा माल थेट इतर राज्यांपर्यंत पोहोचेल, वाहतूक खर्च कमी होईल आणि त्यांना अधिक नफा मिळेल. शेतमाल साठवणुकीचा प्रश्नही आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून मोठ्या गोदामांची उभारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची दीर्घकाळ सुरक्षित साठवण करण्याची सुविधा मिळेल. कांद्याला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, अंबादास बनकर, बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन रतन बोरनारे यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली व्यापारी प्रतिनिधींसोबत बैठक:
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधींची त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांबाबत निवेदन मंत्री छगन भुजबळ यांनी स्वीकारून शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी आश्वस्त केले

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here