
सेवा पंधरवडा आणि आरोग्य अभियानाचे उद्घाटन संपन्न
नाशिक, दि. 17 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचे येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आज सकाळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, पवन दत्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तुकाराम हुलवळे (प्रशासन) आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ झाला. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील धार येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शिधापत्रिका, संजय गांधी योजना मंजुरी पत्र, जीवंत सातबारा, वनपट्टे आदी विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवडय़ात तीन टप्प्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. सन 2027 पर्यंत एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल. याबरोबरच पाणीपुरवठा, शौचालय, सौर ऊर्जेचा लाभ देण्यात येईल. आरोग्य विमा, उज्ज्वला गॅस योजना, मोफत धान्य देण्यात येत आहे. त्याबरोबरच आता
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.
आमदार श्रीमती फरांदे म्हणाल्या की, सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, सेवा पंधरवड्यानिमित जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात पाणंद रस्ते मोकळे करणे, ग्रामीण भागातील रस्त्यांना संकेतांक देणे, सर्वासाठी घरे मोहीम, आयुष्मान कार्डचे वितरण, स्वच्छता मोहीम आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी सूत्रसंचलन केले. तर उपस्थितांचे आभार डाॅ. निलेश पाटील यांनी मानले.
यावेळी महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

