नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन

नाशिक। दि. १३ जून २०२५: नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

मंत्री सामंत म्हणाले की, अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील. त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्पर्श लाभलेला असेल. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या गठित करण्यात येतील. या संमेलनाचे कार्यालय नाशिक येथे १६ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाच्या माध्यमातून संमेलनाच्या तयारीचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. या संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे नियोजन करण्यात येईल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

या संमेलनात पुस्तक आदान- प्रदानाचा उपक्रम असेल. या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या संमेलनात हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पुणे येथील संमेलनात ३५ हजार वाचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता, असे सांगत मंत्री श्री. सांमत यांनी मराठी साहित्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येईल. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहकार्य लाभणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समीक्षक डॉ. वरखेडे, कुलगुरू डॉ. सोनवणे, ॲड. ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790