नाशिक | दि. ७ ऑक्टोबर २०२५: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबद्दल शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत. देशभरातून असंख्य भाविक भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी या पवित्र स्थळी येतात. मागील काही वर्षांपासून नगरपरिषदेच्या वतीने वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारले जात होते. यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदार नेमण्यात आला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील वातावरण ताणले गेले होते. या प्रकारांमुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेत प्रवेश शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रवेश शुल्कातून नगरपालिकेला मिळणारा सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा वार्षिक महसूल आता नगरविकास विभागामार्फत भरून काढण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
![]()

