नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय -4 ), आविष (5) ही दोन्ही चिमुकली मुले पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छोट्याश्या पाण्याच्या डबक्यात पडली. सदर घटनेने संपूर्ण रामनगरवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथे राहणारे रवींद्र भंडकर हे लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. तर त्यांची मुले व पत्नी घरी होती. सदर दोघे बहिण-भाऊ खेळत खेळत घरापासून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या डबक्याकडे गेले. ती खेळता खेळता त्या डबक्यात पडली. त्यांना बाहेर पडता आले नाही यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
बाहेरगाहून जेव्हा लोक गावात आले. तेव्हा पाण्याच्या डबक्याजवळ अन्य लहान मुले का आरडाओरड करत आहेत, म्हणून लोकांनी धाव घेतली. तेव्हा धनश्री व आविष हे दोघे बहीण भाऊ पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत आढळून आले.
यानंतर गावातीलच भाऊराव मंडले आणी सोमनाथ मंडले यांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. लागलीच ग्रामस्थांनी जवळील मनेगाव येथील खासगी दवाखान्यात हलवले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पोलीस पाटील सविता गोफणे यांनी सिन्नर पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. सिन्नर पोलीस स्टेशनचे राठोड, तांबडे व यादव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली आणि त्या बालकांचे मृतदेह सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवले.