नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
चैत्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी एसटीची सुविधा
नाशिक (प्रतिनिधी): चैत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वणी येथील सप्तशृंग गडावर येत असतात. या भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने नियमित बसेसबरोबरच ई-बसेसची सुविधा १ एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक ते सप्तशृंगी या मार्गावर ई-बससाठी १७० रुपये प्रतिप्रवासी भाडेदर असणार आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने प्रदूषण टाळण्यासाठी टप्याटप्याने विविध मार्गावर इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात येत आहेत. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाची यात्रा लक्षात घेता या मार्गावरील भाविकांची संख्या वाढणार आहे. याचमुळे १ एप्रिलपासून नाशिक ते सप्तशृंग गड या मार्गावर प्रायोगिक तत्वावर २ बसेसच्या सहा फेऱ्या अशा एकूण १२ फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
संपूर्ण वातानुकूलित तसेच पर्यावरणपूरक बसेस सकाळी ५ वाजेपासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत जुने सीबीएस बसस्थानक येथून सुटणार आहेत. या बसमध्ये ५ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकिटांची सवलत लागू असणार आहे. एसटीच्या विविध सवलतीही या बसेससाठी लागू असणार आहेत, पर्यावरणपूरक बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
लालपरीचे प्रति प्रवासी भाडेदर ११५ रुपये:
सप्तश्रृंग गडासाठी लालपरी बसचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रतिप्रवासी भाडेदर ११५ रुपये फुल तिकीट तर ६० रुपये हाफ तिकीट असणार आहे, तर इलेक्ट्रिकल बससाठी फुल भाडे प्रतिप्रवासी १७० रुपये असणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.