
नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२५: नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा स्वच्छ, हरित, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आनंददायी होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींनी आज त्र्यंबकेश्वर येथे भेट देत तेथील साधू – महंत यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी महानिर्वाणी, आनंद ,बडा उदासीन, नया उदासीन, निर्मल, अटल, जुना आखाडा, निरंजनी, आवाहन व अग्नी या दहा शैव आखाड्यांना भेट देऊन आखाड्याच्या महंतांशी त्यांचे अभिप्राय व मागण्या याबाबत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी स्वामी शंकरानंद सरस्वती, महंत भारद्वाज गिरी, महंत शिवगिरी व अन्य आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते.
यावेळी उपस्थित साधुमहंतांनी कुंभमेळा 2027 च्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रशासनाकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने आखाड्यांकडे जाणारे रस्ते, आखाड्यांना आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा व साधूंच्या निवासाबाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या. साधू, महंत, आखाडे, तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित, स्थानिक नागरिक आणि भाविक यांच्या सहकार्याने येणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि आनंददायी करण्याचा विश्वास यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केला.