नाशिक, दि. 29 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, वीरपत्नी यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण, 12 वी मध्ये 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मिळविणाऱ्या नाशिक विभागीय मंडळातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांना तसेच सी.बी.एस.ई/ आय.सी.एस.ई बोर्ड मधून पहिल्या वीस पाल्यांना रूपये 20 हजार रोख रक्कम विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात भाग घेतलेल्या व पदक प्राप्त केलेले पाल्य, साहित्य, संगीत, गायन, वादन, नर्तन, उद्योजक, संगणक, संशोधन इत्यादी क्षेत्रात पुरस्कार मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमूल्य कामगिरी करून राज्याची/देशाची प्रतिमा वाढवतील असे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक/ वीरपत्नी/ पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर रूपये 25 हजार रोख, सन्मान चिन्ह/ प्रशस्ती पत्र व आंतराष्ट्रीय पातळीवर रूपये 50 हजार रोख, सन्मान चिन्ह/ प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून पात्र व्यक्तींनी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत,असेही आवाहन लेप्टनंट कर्नल श्री. सोनवणे यांनी केले आहे.