नाशिक। दि. २७ जुलै २०२५: पहिला श्रावण सोमवार उद्या असून, कपालेश्वरसह सोमेश्वर येथे दर्शनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे शहरातून लाखो भाविक जातील याकरिता ठक्कर बसस्थानक येथून स्वतंत्र २५ जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. सध्या या मार्गावर नियमित १६० फेऱ्या आहेत. भाविकांची गर्दी पाहता गोदाकाठ व सोमेश्वर येथे जीवरक्षक तैनात केले जातील. रविवारी दुपारपासूनच जादा बस त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जातील.
रस्त्यावर नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी ग्रामीण पोलिसांकडून खबरदारी घेतली जाईल. महत्त्वाच्या पॉइंटवर पोलिस कर्मचारी तैनात असतील. लाखोंच्या संख्येने गोदावरी पात्रात स्नान करण्यासह कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविक जमतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मालेगाव स्टॅण्ड, खांदवे सभागृह, सरदार चौक, ढिकले वाचनालय येथून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या वाहनांसाठी सकाळी सहा ते रात्री दहादरम्यान प्रवेश बंद असेल.